a

a
a

Tuesday, July 19, 2022

निपुण भारत अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

निपुण भारत अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

 नंदुरबार दि.१९ ( वृत्तसेवा) निपुण भारत मिशन अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान प्रभावी अंमलबजावणीसाठी भाषा व गणित विषयाच्या घटक संच उपयुक्ततेबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथे दि.१८ जुलै रोजी भाषा विषयाची व १९ जुलै रोजी गणित विषयाची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील ९५ केंद्रातील प्रत्येकी एक भाषा व गणित विषयाचे तज्ञ शिक्षक सहभागी होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षणाधिकारी प्राथमिक सतीश चौधरी तसेच वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.मान्यवरांच्या हस्ते शालेय शिक्षण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी विद्यार्थ्यांना शिकवणे यापेक्षा विद्यार्थ्यांचे शिकणे यावर भर देण्याबाबत आवाहन केले. तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक  सतीश चौधरी यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान महत्वपूर्ण ठरेल, यासाठी सर्व शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांनी एकत्रित प्रयत्न करून प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतांमध्ये वृद्धी व्हावी यासाठी नाविन्यपूर्ण कार्य करण्याची गरज स्पष्ट केली. तसेच या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी यांनी निपुण भारत सरकारची  निपुण मार्गदर्शिका व महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या ५० दिवसीय उपक्रमाचे  महत्त्व स्पष्ट केले. निपुण भारत अंतर्गत जिल्हास्तरीय सुकाणू समिती व जिल्हा प्रकल्प सनियंत्रण कक्ष यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथजी गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मीनल करणवाल, डॉ. मैनक घोष यांच्या मार्गदर्शनातून सदर कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सदर दोन दिवशीय कार्यशाळेतून केंद्रस्तरीय सुलभकांना घटक संचातील कृतींची सविस्तर माहिती,विविध साहित्यांच्या उपयोगासह स्पष्ट करण्यात आली. सदर कार्यक्रम ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२२ या काळात मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान कार्यक्रमाचे नियोजनबद्ध कृतींचा संच जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नगरपालिका प्राथमिक शाळा, शासकीय आश्रम शाळा व अनुदानित आश्रम शाळा अंतर्गत इयत्ता २ री ते ८या वर्गासाठी राबविण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण यशस्वीतेसाठी अधिव्याख्याता सुभाष वसावे यांच्यासह जिल्हास्तरीय सुलभक संदीप पाटील, अनंत सूर्यवंशी, रविकिरण सोनवणे ,विशाल चव्हाण, धीरज खैरनार ,कल्पेश गोसावी, हमीद खाटीक, रोहिणी पाटील, रोहिणी बाविस्कर, चेतना चावडा, सुनंदा भावसार, गीतांजली भोई , जयश्री सानप, जयश्री सैंदाणे, रेखा दुरंगी, सोनल बोरसे यांच्यासह तांत्रिक सहाय्य प्रमोद बागले व गोविंद वाडीले यांनी परिश्रम घेतले.

Tuesday, July 5, 2022

बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त वैजाली जि.प.शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त वैजाली जि.प.शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
 नंदुरबार दि.५ मा. शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.ओमप्रकाश बच्चुभाऊ कडू यांच्या ५३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम म्हणून प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी स्व:खर्चाने शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजाली येथे शालेय विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करून शैक्षणिक साहित्य वाटपाच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिक्षण हे वाघिणीचे दूध म्हटले जाते; परंतु आर्थिक अडचणीमुळे असंख्य गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य होत नाही. सध्याची वाढती महागाई पाहता शिक्षणासाठी लागणारे साहित्यही अतिशय महाग झाले आहेत. शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी राज्याध्यक्ष विकास घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान, वृक्षारोपण, रूग्णालयात फळे वाटप अनेक उपक्रम राबिविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या आर्थिक मदतीचे चीज करून विद्यार्थ्यांनी आपले उज्ज्वल भविष्य घडवावे. या मुलांना हवे ते शिक्षण घेता यावे यासाठी शक्य तितकी मदत संघटनेकडून करील. इच्छाशक्ती असेल तर माणूस कोणतेही काम जिद्दीने पूर्ण करू शकतो. शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे. आदिवासी भागात विद्यार्थ्यांना पुस्तक संच व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने हे शैक्षणिक साहित्य या विद्यार्थ्यांना वाटण्यात आले. विद्यार्थ्यांना वह्या, पेन, फळे व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटूंबातील मुलांचे शिक्षण अवघड झाले आहे. ही गरज लक्षात घेवून त्यांना एक हात मदतीचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे असेही जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुदाम पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या कविता सोमवंशी,सुरेखा पाटील, शिक्षक भरत पावरा, शिक्षक राजू मोरे उपस्थित होते.

‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ची प्रभावीपणे अंमलबजावणी कराजिल्हाधिकारी मनीषा खत्री..

‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ची प्रभावीपणे अंमलबजावणी करा
जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार, दि.५  शाळेत दाखल होण्यास पात्र शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करणे तसेच बालकांची शाळेतील गळती शून्यावर आणण्यासाठी ५ जुलै ते २० जुलै २०२२या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी ‍दिले. 'मिशन झिरो ड्रॉप आऊट’ मोहिम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात  नुकतीच बैठक संपन्न झाली. बैठकीस  मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जगराम भटकर, आदी उपस्थित होते. श्रीमती मनीषा खत्री म्हणाल्या की,  बालकांना मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. त्यामुळे ५ जुलै ते २०जुलै,२०२३ या कालावधीत ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’  मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शाळेत दाखल होण्यास पात्र शाळाबाह्य बालकांचा शोध घेताना ग्रामपंचायत, नगरपरिषद, जन्म मृत्यू अभिलेख्यामधील नोंदी, कुटुंब सर्वेक्षण, तात्पुरते स्थलांतरित कुटुंबात असणाऱ्या बालकांची माहिती,  शाळाबाह्य, अनियमित बालकांची माहिती घ्यावी. जिल्हातील सर्व खेडी, वस्ती,  वाडी,  गाव,  वार्ड वास्तव्य करणाऱ्या शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करावे. यासाठी गाव पातळीवर मासिक सभा, ग्रामसभा, शाळा व्यवस्थापन समितीने सभा घ्याव्यात. मिशन झिरो ड्रॉपआऊटची प्रसारमाध्यमातून प्रचार व प्रसिद्धी करावी. शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक),  जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास),  बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण व नागरी) यांच्याकडून गाव. केंद्र, बीट, विभाग व शाळास्तरानुसार नियोजन करण्यात करावे. महसूल, ग्रामविकास,  नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास,  कामगार विभाग, आदिवासी विकास विभाग व स्वंयसेवी संस्थांच्या समन्वयाने ही मोहीम यशस्वी राबवून या अभियानात एकही बालक शाळाबाह्य, स्थलांतरित बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी,असे त्यांनी सांगितले. बैठकीस विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.